22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचे घर १५०० रुपयांत चालते का?

मुख्यमंत्र्यांचे घर १५०० रुपयांत चालते का?

लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याची राऊतांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेनंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली. या योजनेवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना १० हजार रुपये रक्कम देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेतून महिलांनाही १० हजार रुपये देण्याची मागणी सरकारला केली आहे. महाराष्ट्रात स्त्री- पुरुष समानता आहे हे दाखवून द्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

पैशांची खरी गरज लाडक्या बहिणीला आहे. कारण ती घर चालवते. पण घरात भाऊ, नवरा बेरोजगार कारण नोक-या नाहीत. २ हजार जागांसाठी २५ हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली होती. ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. लाडक्या बहि­णींच्या खात्यावर १० हजार रुपये टाका. १५०० रुपयांनी काय होते? मुख्यमंत्र्यांचे घर १५०० रुपयांत चालेल का? लाडक्या बहिणीवर मुख्यमंत्री अन्याय का करत आहेत. लाडक्या बहीण- भावाला १० हजार रुपये द्या. स्त्री-पुरुष समानता आहे हे महाराष्ट्रात दाखवून द्या हीच आमची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यावर ८ लाख कोटींचे कर्ज आहे आणि ही रक्कम छोटी नाही. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर या सरकारने नव्या योजना लागू केल्या आहेत. राज्यात बेरोजगार, शेतकरी यांच्या आत्महत्या थांबायला हव्यात, असेही संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR