लातूर : प्रतिनिधी
मुरुड (ता. लातूर) येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे, घरांचे, बाजारपेठेतील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी बुधवारी केली.
मुरुड येथे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेतक-यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिका-यांना पत्र दिले. मूरुड येथे ढगफुटी झाल्यामुळे अनेक नागरिक पूरग्रस्त झाले.आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने तात्काळ कार्यरत होऊन पूरग्रस्तांची मदत करून त्यांची मंदिरामध्ये व्यवस्था केली. याबद्दल आपत्ती व्यवस्थापनाच्या चमुचे अभिनंदन करतो. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, घरांचे तसेच बाजारपेठेतील दुकानांचे माठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सर्वतोपरी मदत करावी. येथील शेतक-यांचे काढणी योग्य सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या शेतक-यांचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत संबंधित महसूल व विमा कंपनी यांच्या यंत्रणांना सूचित करुन आपत्तीग्रस्त शेतक-यांंना दिलासा द्यावा, असे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.