छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
सतत वादग्रस्त विधान करणा-या संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान, असे वक्तव्य भिडेंनी केले आहे. सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत. ते थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचे भिडे म्हणाले. देशातील उत्सवांवरही त्यांनी भाष्य केले आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. नवरात्रोत्सवानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धारक-यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
देशाच्या पाठीवर असंख्य अतिक्रमणं झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. हिंदी-चिनी आणि हिंदी-मुस्लिम भाई म्हणणा-या हिंदूंना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण, चांगलं कोण, हे कळत नाही. कारण हिंदू महामूर्ख आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्रोत्सवाचा दांडिया हिंदू समाजाला मूर्ख बनवत चालला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज आहे असे विधान देखील संभाजी भिडे यांनी केले आहे. दुर्गामाता दौडीमध्ये असणा-या पोलिसांनी देखील टोप्या घालून आपल्यासोबत दौडीत पळाले पाहिजे, असेही भिडे यांनी यावेळी सांगितले.
विरोधकांची टीका
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार कोणाही व्यक्तीला नाही, अशी टीका करत संभाजी भिडे यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे असल्याचा आरोपही संभाजी भिडे यांनी केला आहे.