29.2 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeराष्ट्रीयमेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

झाशी : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील झाशीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये आग लागल्याने १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून १६ बालके गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वॉर्डात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील नवजात शिशु वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीमुळे या वॉर्डमधील १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर १६ जखमी झाले आहेत. यातील ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात आले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.

आगीची घटना घडताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. मुलांचे पालक आक्रोश करत बाळांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, अग्निशमन दलाने ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले आहे. तर ही दुर्घटना घडली त्यावेळी या वॉर्डमध्ये ५४ नवजात बालके होती.

या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत ताबडतोब चौकशीचे आदेश दिले आहेत.

नर्सने काडीपेटीची काडी पेटवली?
आगीबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका नर्सने ऑक्सिजन सिलिंडरच्या पाईपला जोडण्यासाठी काडीपेटीची काडी पेटवली आणि आग लागली. यानंतर संपूर्ण वॉर्डने पेट घेतला. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किट हे कारण सांगितले जात असले तरी भगवान दास हा या घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी असून यामागचे खरे कारण सांगत आहेत. भगवान दास यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या पाईपला जोडण्यासाठी नर्सने काडीपेटीची काडी पेटवली. त्यानंतर आग लागली आणि संपूर्ण वॉर्ड पेटला. आग लागल्याचे लक्षात येताच भगवान दास यांनी त्यांच्या गळ्यात असलेला कपडा घेतला आणि ३ ते ४ मुलांना वाचवले.

फायर अलार्म नावालाच
धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यानंतर ना फायर अलार्म वाजला, ना वॉर्डात ठेवलेल्या सिलिंडरचा काही उपयोग झाला. सिलिंडर फिलिंग डेट २०१९ आहे आणि एक्सपायरी डेट २०२० आहे. म्हणजे अग्निशमन यंत्राची मुदत संपून अनेक वर्षे लोटली होती आणि हे सिलिंडर नुसते दाखवण्यासाठी येथे ठेवण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR