पुणे : प्रतिनिधी
मैदानावर फलंदाजी करताना प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे मनावर असते, त्याकडे कसे पहायचे व त्याचे व्यवस्थापन यावर यश अवलंबून असते असे भारतरत्न सचिन तेंडुलकर याने मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले.
चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात तेंडुलकर याची मुलाखत पत्रकार सुनंदन लेले यांनी घेतली.
मैदानावर खेळताना पाठीशी बळ असायचे ते म्हणजे देशाची आणि कुटुंबाची सदिच्छा, शुभेच्छा होय असे नमूद करून सचिन म्हणाला की, ही सदिच्छा, शुभेच्छा मनोधैर्य वाढविणारी ठरली. तसेच खेळाडू हा मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर शरीर चांगली साथ देत असते.एखादी अपयशाची खेळी स्वीकारल्याने मन तयार होते आणि त्यावर मात करता येते असेही तो म्हणाला.
सन ८५ मध्ये पुण्यातील मैदानावर खेळण्याची संधी मिळाली त्यामुळे येथून एका अर्थाने खेळाची कारकीर्द सुरू झाली. आणि या शहराशी नाते जुळले असे त्याने सांगितले. मुलाखतीच्या माध्यमातून सचिन याने या क्षेत्रातील विविध घडामोडींवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात गायक आनंद भाटे, बासरीवादक अमर ओक आणि कवी वैभव जोशी यांनी सांगीतिक कार्यक्रम सादर केला. भाटे यांनी ‘बाजे रे मुरलिया बाजे’ ही रचना आणि ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही भैरवी सादर केली तर ओक यांनी बासरीवर राग हंसध्वनीचे सादरीकरण केले.