नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मोहम्मद शमी २६ महिन्यानंतर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. अशा स्थितीत एकीकडे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे एक शमीच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे पुढे सर्व काही ठीक होईल अशीच अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत.
दरम्यान, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार झाली आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या गोटात कही खुशी कही गम सारखं वातावरण आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर आणि टी२० क्रिकेटमध्ये २६ महिन्यानंतर मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. तर जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत अजूनही चिंतेचे वातावरण आहे. पण यात आता एका फोटो आणखी भर पडली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी२० मालिका २२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये मोहम्मद शमीने भाग घेतला. या ट्रेनिंग सेशनमधील फोटो पाहिला तर क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.
सराव शिबीरात नेमकं असे काय झाले की टेन्शन वाढले आहे. त्याचं झालं असं की, मोहम्मद शमी सरावादरम्यान गुडघ्याला पट्टी बांधून मैदानात उतरला होता. इतकंच काय तर हाताच्या पंजालाही पट्टी बांधली होती. त्यामुळे तो फिट आहे की अनफिट असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. कारण अशा पट्ट्या बांधून सराव करणं हे काही फिट खेळाडूचे लक्षण नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.