‘हवा में उडता जाए, मोरा लाल दुपट्टा मलमल का’च्या वयात चेन्नईच्या दोम्माराजू गुकेशने ६४ घरांच्या पटावर जगज्जेतेपदाची मोहोर उमटवली. काळ्या मोह-यांनिशी खेळणा-या गुकेशने सिंगापूर येथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गुरूवारी चीनच्या डिंग लिरेनची अभेद्य भिंत १४ व्या आणि अखेरच्या डावात भेदली. माजी विश्वविजेत्या ३२ वर्षीय लिरेनला १८ वर्षीय गुुकेशने चितपट करून भारतीय तिरंगा डौलाने फडकावत बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान मिळवला. भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी गुरूवारचा दिवस गुकेशने संस्मरणीय ठरवला. विश्वनाथन आनंदनंतर गुकेश भारताचा दुसरा जगज्जेता ठरला. गुकेशने रशियाच्या गॅरी कास्पारोव्हचा (२२ व्या वर्षी) गत १४ वर्षापासूनचा युवा जगज्जेतेपदाचा विक्रम मोडीत काढत नव्या अध्यायाची नोंद केली. सुमारे ४ तास रंगलेल्या १४ व्या आणि अखेरच्या फेरीत डिंग लिरेनला ५८ चालींमध्ये पराभूत होण्यास भाग पाडणारा गुकेश हा जगातील एकूण १८ वा जगज्जेता ठरला.
वयाच्या १८ व्या वर्षी १८ वा जगज्जेता! लिरेनने १३८ वर्षाच्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या इतिहासात केलेली सर्वांत मोठी घोडचूक गुकेशच्या पथ्यावर पडली. १४ वा डाव बरोबरीत सुटला असता तर शुक्रवारपासून टायब्रेकरद्वारे सामन्याचा निकाल लागला असता मात्र गुकेशने ७.५-६.५ अशा फरकाने विजय मिळवत जगज्जेतेपदाला गवसणी घातली. पांढ-या मोह-यांसह खेळताना लिरेनने डावाची आश्वासक सुरुवात केली होती. गुकेशने डावाच्या मध्यात आपली पटावरील स्थिती मजबूत केली होती त्यामुळे ही लढत बरोबरीत सुटेल, असे वाटत असतानाच लिरेनने १९ व्या चालीत मोठी चूक केली आणि त्याचा फायदा उठवत गुकेशने लिरेनला चेकमेट केले. जगज्जेतेपदाची ही लढत गुकेश १२ व्या फेरीआधीच सहज जिंकेल, असे भाकित अनेक बुद्धिबळ पंडितांनी वर्तवले होते. कदाचित त्यांना गत वर्षभरापासून मोजक्याच स्पर्धांमध्ये खेळणा-या लिरेनच्या ताकदीचा अंदाज आला नसावा.
स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच फेरीत लिरेनने पांढ-या मोह-यांसह गुकेशला पराभूत केले होते; परंतु गुकेशने ‘हार नही मानुंगा’ असे म्हणत तिस-या फेरीत लिरेनला जशास तसे प्रत्युत्तर देत पराभवाचा बदला घेतला होता. त्यानंतर सलग ७ डाव बरोबरीत सोडवल्यानंतर गुकेशने ११ व्या डावात विजय मिळवत आघाडी घेतली होती; परंतु लिरेनने जोरदार मुसंडी मारत १२ वा डाव जिंकला आणि सामना बरोबरीत आणला. ६.५-६.५ अशा गुण बरोबरीत अखेरचा डाव सुरू झाला. या डावात पांढ-या मोह-यांसह खेळणा-या लिरेनची घोडचूक गुकेशच्या पथ्यावर पडली आणि प्रतिस्पर्ध्याला ‘चेकमेट’ देत गुकेशने पहिल्याच प्रयत्नात जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. सामन्यानंतर गुकेश म्हणाला, गत दशकभरापासून मी या क्षणाचे स्वप्न बघत होतो. १४ वा डाव ज्या प्रकारे सुरू झाला तो पाहता मला जिंकण्याची खात्री नव्हती; पण मला प्रतिस्पर्ध्यावर दडपण टाकण्याची संधी मिळाली आणि मी ती साधली. या स्पर्धेत गुकेश पहिल्या डावात पराभूत झाला होता; परंतु अखेरच्या डावात त्याने काळ्या मोह-यांनिशी लिरेनवर बाजू उलटवली.
२०१० मध्ये विश्वनाथन आनंदने बल्गेरियाच्या टोपालोवविरुद्ध पहिल्याच डावात हार पत्करली होती; पण १२ डावांच्या त्या लढतीत अखेरच्या डावात काळ्या मोह-यांनिशी खेळून टोपालोववर बाजी उलटवत आनंदने जगज्जेतेपद पटकावले होते. २०२४ मध्ये त्या इतिहासाची पुनरावृत्ती घडली २००६ मध्ये जन्मलेल्या गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासूनच बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. त्याचे वडील रजनीकांत हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर आई पद्मा यांनी जीवशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. गुकेशने २०१५ मध्ये ९ वर्षाखालील गटात आशियाई शालेय स्पर्धा जिंकली. २०१८ मध्ये १२ वर्षाखालील गटात जागतिक युवा स्पर्धेचे जेतेपद मिळवले तर याच सालात आशियाई युवा स्पर्धेत तब्बल ५ सुवर्ण पदके जिंकण्याची किमया साधली. २०१७ पासून गुकेश वरिष्ठ गटात (खुल्या) खेळण्यास पात्र ठरला. ऑक्टोबर २०२२ मध्ये गुकेशने जलद बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला होता. मॅग्नस त्या वेळचा जगज्जेता होता. या विजयामुळे गुकेशकडे जगाच्या नजरा वळला होत्या.
२०२४ मध्ये गुकेशने कँडिडेटस् स्पर्धेत बाजी मारली. त्यानंतर भारतीय पुरुष संघाला ऑलिम्पियाड सुवर्ण मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आणि आता जागतिक जेतेपद मिळवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. जागतिक लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतात. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरतो. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जातो. काळ्या मोह-यांनी ४० चाली होत नाहीत तोवर सामना बरोबरीत सोडवता येत नाही. १४ डावानंतरही गुण बरोबरी राहिल्यास विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा आधार घेतला जातो. गुकेशला विश्वनाथन आनंदचे मार्गदर्शन लाभले आहे. अखंड मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे. इतक्या कमी वयात त्याने जी प्रगल्भता दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे. तो बेधडक, आत्मविश्वासपूर्ण खेळ करतो. मोक्याच्या क्षणी संतुलन ढळू न देण्याचा गुण त्याच्याकडे आहे. गुकेशचे कौशल्य आणि मानसिक स्थैर्य अफलातून असेच होते.
त्याने शेवटपर्यंत जिंकण्याची जिद्द सोडली नाही. या उलट लिरेनने बचावात्मक खेळावर अधिक भर दिला शिवाय तो टायब्रेकरवर अति विसंबून राहिला. ढासळलेल्या मनोवृत्तीतून त्याला सावरता आले नाही. त्याने गुकेशच्या विजयाचे कौतुक केले आहे. या जेतेपदाबद्दल गुकेशला १३ लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे. भारताकडे गुकेशसह आर. प्रज्ञानंद, विदीत गुजराथी, दिव्या देशमुख, तानिया सचदेव, असे असंख्य गुणवान बुद्धिबळपटू आहेत. यंदाचे वर्ष भारतीय बुद्धिबळाचा कायापालट करणारे वर्ष ठरले आहे. वर्षाच्या प्रारंभीच नागपूरच्या दिव्या देशमुखने कनिष्ठ गटाचे जागतिक जेतेपद मिळवले असून ३ बुद्धिबळपटू कँडिडेटस् स्पर्धेसाठी पात्र ठरले. ६४ घरांचा राजा गुकेशला मानाचा सलाम! हिंदी चित्रपट गीतात मुकेश तसा बुद्धिबळात गुकेश!