पुणे: आयुष्य प्रचंड आव्हानात्मक आहे. मात्र आयुष्यात येणा-या प्रत्येक संकटाला ‘ऑल इज वेल’ म्हणत विद्यार्थ्यांनी धीराने तोंड द्यायला हवं. यासह, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यात करिअर करायला हवं. आवडीचे क्षेत्र ठरल्यानंतर परिणामाची चिंता न करता ‘नेवर गिव अप’ वृत्ती स्विकारुन यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका आणि यश प्राप्तीनंतर त्यात झोकून देऊन आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. या प्रक्रियेत ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यांचाच विचार करावा व ज्या नाहीत त्यांची चिंताच करू नका, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते शरमन जोशी यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सातव्या ‘पर्सोना फेस्ट-२५’ या वर्षातील सर्वांत मोठ्या कला महोत्सवाच्या समारोपात बोलत होते. याप्रसंगी, शरमन यांच्या पत्नी प्रेरणा चोप्रा-जोशी, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ.सुदर्शन सानप, डॉ.विपुल दलाल, डॉ.रेणू व्यास, डॉ.सुराज भोयार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शरमन जोशी यांनी त्यांच्या ‘थ्री इडियट्स’ या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटातील ‘गिव मी सम सनशाईन’ या गाण्यातील कवितेच्या ओळी म्हणत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील विचाराप्रमाने एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील आहे, असे म्हणत त्यांनी सर्वांचे तोंडभरून कौतुक देखील केले.
प्रा.डॉ.कराड म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना २००९ साली अमीर खान व शरमन जोशी यांचा सहभाग असणारा, ‘थ्री इडियट्स’ हा अतिशय सुंदर सिनेमा पाहण्यात आला. त्या सिनेमात देण्यात आलेल्या संदेशा प्रमाणे विद्यार्थ्यांना कला, डिजाईन आणि तंत्रज्ञान यांचा संगम असणारे व त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे शिक्षण देणारे एखादे विद्यापीठ असावे, अशा विचाराने एमआयटी एडीटी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, असे ते शरमन जोशी यांना उद्देशून म्हणाले.
तसेच, पर्सोना सारखे महोत्सव विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणारे तथा त्यांच्यातील कलेचा साक्षात्कार करून देणारे उत्तम व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता, पसायदानाने करण्यात आली. ज्याचे, प्रास्ताविक डॉ.सुराज भोयार यांनी तर आभार, डॉ.सुदर्शन सानप यांनी मानले.