लातूर : प्रतिनिधी
सणासुदीमध्ये प्रवाशांची सोय व्हावी या उद्देशाने लातूर विभागामार्फत १७ ऑगस्ट ते २१ ऑगस्टदरम्यान ४८२ विशेष गाड्यांच्या फे-यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यातून लातूर विभागाला सवलतीसह ५ कोटी ७६ लाख ४२ हजार ५४४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रक्षाबंधनाची सर्वाधिक ओवाळणी एस. टी. महामंडळाला मिळाली.
गतवर्षाच्या तूलनेत यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटी महामंडळा मार्फत १० लाख २० हजार २१३ प्रवाशांनी आपला प्रवास केला असल्याचे लातूर विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी सागीतले. सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यानुसार लातूर विभागाने १७ ते २१ ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये जादा एसटी फे-यांचे नियोजन करण्यात आले होते. या कालावधीत प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटी गाडयांमधून प्रवास करत ५ कोटी ७६ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळालं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रीमी उत्पन्न आहे. जिल्ह्यातील अनेक नागरीक हे दैनदिन कामानिमित्त शेजारील जिल्ह्यात तसेच पुणे येथे वास्तव्यात आहेत. रक्षाबंधन या सणाला भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठया प्रमाणामध्ये होते. त्यामुळे रक्षाबंधनाला लातूर विभागामार्फत एसटी गाड्यांच्या फे-यात वाढ करण्यात आली होती.
लातूर-सोलापूर, लातूर-नांदेड, लातूर-उदगीर, लातूर-धाराशिव, लातूर-पुणे या मार्गावरही जादा बस सेवा देवून प्रवाशांची सोय करण्यात आली होती. या पाच दिवसाच्या कालावधीत एसटी बसेसने ९ लाख ४३ हजार ७६६ किलोमिटर अंतर कापत लातूर विभागाला सवलतीसह ५ कोटी ७६ लाख ४२ हजार ५४४ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.