22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे फक्त बडबड करतात

राज ठाकरे फक्त बडबड करतात

शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी
आपल्या राज्यात महापुरुषांना आणि संतांना आडनावाने किंवा जातीने पाहिले गेले नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात या गोष्टी सुरू झाल्या. राज्यात जातीचे विष शरद पवार यांनी कालवले, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड प्रत्युत्तर देताना म्हणाले, राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांच्याकडे लक्ष देत जाऊ नका.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या टीकेबाबतही विचारण्यात आले. राज ठाकरे दरवेळी हेच बोलतात. पण जातीपातीचे राजकारण कोण करते? कोण भोंगे पाडायला जाते? कोण उत्तर प्रदेशच्या लोकांना मारायला जाते? हे संपूर्ण देशाला माहिती आहे. राज ठाकरेंना फक्त बडबड करायची असते, ती त्यांना करू द्या. त्यांच्याकडे जास्त लक्ष देत जाऊ नका.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले होते. यासंदर्भात विचारले असता, राज ठाकरेंनी आज सरकारवर टीका केली आहे, पण उद्या चालून ते एकनाथ शिंदेंबरोबर चहा पिताना दिसतील. एकनाथ शिंदे त्यांच्या घरी जातील, चहा आणि बिस्किट खाऊन येतील. त्यामुळे अशा लोकांबद्दल विचारत जाऊ नका, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR