पुणे : प्रतिनिधी
राज्याबरोबरच पुण्यातही झिकाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. झिकाचा संसर्ग आटोक्यात आणण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले असून पुणे शहरात आतापर्यंत सर्वाधिक ६६ रुग्ण आढळून आले आहेत.
तर राज्यात आत्तापर्यंत एकूण ८० रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत आहे. झिका व्हायरस हा एडिस इजिप्ती डासांच्या माध्यमातून पसरतो. प्रामुख्याने झिकाचा संसर्ग होण्याचे हे मुख्य कारण आहे. हा डास दिवसाही चावतो. त्याबरोबरच लैंगिक संबंध किंवा प्रसूतीदरम्यान संक्रमित आईकडून गर्भातील बाळालाही तो होतो.
– झिका हा तसा जीवघेणा आजार नाही. झिका विषाणूचा संसर्ग असलेल्या बहुतेक लोकांमध्ये सुरुवातीला लक्षणे आढळून येत नाहीत. नंतर पुरळ येणे, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून येतात. जी २ ते ७ दिवस टिकतात.