मुंबई : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर काँग्रेस महाविकास आघाडी बहुमताने जिंकत असून, महाराष्ट्रात देखील २०० पारने जिंकू, असा दावा केला. महाराष्ट्रातील असंविधानिक सरकार हद्दपार होणार आहे आणि जनताच त्यांना घालवणार असल्याचा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील महायुती सरकारला असंविधानिक सरकार म्हणत, भाजपच्या जातीच्या राजकारणाला महाराष्ट्रासह देश वैतागला आहे. या जुमलेबाज सरकारला आता युवा हद्दपार करणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीच्या २०० पेक्षा जास्त जागा येतील, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकार करत असलेल्या इन्व्हेंटबाजीवर देखील विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. मोठमोठाले स्टेज करून त्यावर रॅम्प लावून त्यावर ‘रॅम्प वॉक’ सरकार करत आहे. सरकार पैशाची उधळपट्टी करत आहे. या योजनेतून माझ्या बहिणींना त्रास दिला जात आहे. पैसे हवे असतील, तर गाडीत बसा, असे फर्मान अधिका-यांमार्फत महिलांना पाठवले जातेय, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. हे दीड हजार रुपये एका पिशवीत टाकून दुस-या पिशवीतून काढून घ्यायचे, असा धंदा या सरकारने चालवला आहे, असा घणाघात देखील विजय वडेट्टीवार यांनी केला.
नरेंद्र मोदी यांची लाट होती. आता त्यांचा फुगा फुटला आहे. आता महाविकास आघाडी आणि काँग्रेस विजयाची निवडून येण्याची शक्यता हा निकष लावून तयारी करत आहेत. त्यानंतर जागेवर निर्णय होईल, असे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. खोटारडेपणा यांची विचारधारा आहे. डीएनएमध्ये खोटारडे आहे. भाजप गेली दहा वर्षे सत्तेत आहे. सत्तेत बसून अजूनही काँग्रेसवर आरोप करत आहे. गांधी, नेहरूंना आजही जबाबदार धरत आहेत. मग सत्तेत कशाला बसले. पाप, भ्रष्टाचार, देशाची तिजोरी साफ यांनी करायची आणि काँग्रेसकडे बोट दाखवायचे, भाजपचे हे धंदे जनतेने ओळखले आहेत, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
किती खोटं बोलावं…
शेतीमालाला भाव मिळत नाही. तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतीमालाला डबल भाव देत असल्याचे जाहीरपणे म्हणत आहेत. नतद्रष्ट लोक पंतप्रधानांना चुकीची माहिती देत असावेत. यातून पंतप्रधान शेतीमालाला डबल भाव देत असल्याचे खुशाल म्हणत आहेत. पंतप्रधानांनी याची माहिती घ्यावी, म्हणजे त्यांना वस्तुस्थिती समजेल, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
मोदींचा परतीचा प्रवास सुरू
नागपूरमधील मेट्रोला परवानगी काँग्रेसनेच दिली होती, याची आठवण विजय वडेट्टीवार यांनी करून दिली. महाराष्ट्राला गुजराती जोडीने उद्ध्वस्त केले आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे, याचा कोणाचा कोणाला पायपोस नाही. खोक्यांचं सरकार आहे. २०२४ मध्ये मोदींचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चारही राज्यांत सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदींना सत्ता सोडावी लागेल, हे जनतेने ठरवले आहे.