मुंबई : प्रतिनिधी
नाना पटोले यांनी भंडारामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन ठरलेले आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे बहुमताचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. महिला असुरक्षित आहेत आणि हे सर्व सरकार जाणूनबुजून करते आहे. या अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध आम्ही शंखनाद पुकारला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यातच आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शाहू, फुले, आंबेडकर त्यांच्या विचाराला संपवण्याचे पाप भाजपप्रणीत एकनाथ शिंदेंचे सरकार करते आहे, त्याच्या विरोधात लोकांमध्ये भयानक राग आहे , असे नाना पटोले म्हणाले.
यावेळी त्यांना पक्षातील बंडखोरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘बंडखोरीचा प्रकार हा सगळ्याच पक्षांमध्ये सुरू आहे. राजेंद्र मुळीक असतील किंवा अन्य कोणीही सगळ्या बंडखोरी आम्ही चार तारखेपर्यंत शांत करू’, असे नाना पटोले म्हणाले.
यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही मोठी टीका केली. हे बेइमान भाऊ जे आहेत, ते स्वत:ला बहिणींच्या जवळचे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या बेइमान भावांना लाडक्या बहिणींनी ओळखून घेतलं आहे. दीड हजार रुपये बहिणींना दिले आणि गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये जी महागाई वाढवली आणि त्यांच्या जवळून पाच हजार रुपये काढलेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
आज बहिणी असुरक्षित
सर्व बहिणी त्यांना ओळखून आहेत. काँग्रेसने याच्यामध्ये जो कायदा केला होता की, मुलीचे सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये नाव असले पाहिजे. दिवाळीचा सण आहे याच्यानंतर भाऊबीज येणार आहे. काँग्रेसने त्या पद्धतीचे कायदे करून प्रेमाचे, बहीण-भावाचे, सन्मानाचे संबंध हे कायम ठेवले पाहिजेत. आज बहिणी असुरक्षित आहेत. चार-पाच वर्षाच्या मुली सुद्धा शाळेत असुरक्षित आहेत. भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशातून सत्तेत बसलेले लोक काहीही जाहिराती करतात. त्याला आता मान्यता नाही. एवढं त्यांनी समजलं पाहिजे.