24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह

राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह

पाच वर्षात ५७५ टक्के वाढ; एकूण संपत्ती ३३८३.०६ कोटी

घाटकोपर : प्रतिनिधी
घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शाह महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये घाटकोपर पूर्वमधून प्रथमच विजयी झालेल्या पराग शाह यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ५७५ टक्क्यांनी वाढ झाली. पराग शाह गेल्या वेळी ५३,३१९ मतांनी विजयी झाले होते. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पराग शाह यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांची एकूण संपत्ती ३३८३.०६ कोटी रुपये आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराग शाह यांनी आपली संपत्ती ५५०.६२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय आहेत. पराग शाह महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराग शाह हे २०१७ मध्ये विजयी झाले होते.

मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती : दक्षिण मुंबईतील विद्यमान आमदार आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील दक्षिण मुंबईतील भाजपचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी देखील प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या ४३६ कोटी ८० लाख ४८ हजार ५९१ रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोढा यांच्यावर सध्या १८२.९३ कोटी रुपयांचे तर त्यांची पत्नी मंजुळा लोढा यांच्यावर १२३.२८ कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोढा यांच्या नावावर एकूण १२३ कोटी ३८ लाख ९८ हजार ५८८ रुपये इतकी संपत्ती आहे. तसेच पत्नीच्या नावावर १० कोटी २८ लाख ७५ हजार ३४० रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे १२५ कोटी ५४ लाख ४९ हजार ७०७ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

५० टक्के रक्कम दान करतो : पराग शाह
दरम्यान, मी ५० टक्के रक्कम दान करतो, असा दावा पराग शाह यांनी केला. अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मला त्याचा चांगला वापर करायचा आहे. देवाने मला सर्व काही दिले आहे, देशाने मला सर्व काही दिले आहे, त्यामुळे मीही काहीतरी दिले पाहिजे, असं मला वाटतं. मी एक नेता, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ताही आहे. मी माझ्या बचतीच्या ५० टक्क्यांहून अधिक समाजसेवेसाठी देतो, असं पराग शाह यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR