बीड : प्रतिनिधी
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील काही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे.
या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे वर्चस्व आहे, आणि त्यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचे नाव आल्यानंतर त्याला तातडीने निलंबित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
याशिवाय, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती. त्यात विष्णू चाटे याचा मुख्य आरोपींमध्ये समावेश असल्याने विष्णू चाटेचे निलंबन करत सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली. यानंतर जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांची निवड होईपर्यंत राजेश्वर चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य पाहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी निवडींमध्ये कार्यकर्त्यांच्या चारित्र्याची चांगली तपासणी करण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे.