नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होऊ शकते. तसेच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणही सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर वाद सुरू झाला. पक्षाचे जवळपास ४३ आमदार आहेत तर शरद पवारांकडे १२ आमदार आहेत. त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केले. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणीची शक्यता आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव दिले होते तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. त्या चिन्हावर निवडणूक लढवून शरद पवारांनी ८ खासदार निवडून आणले. दुस-या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला. सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. त्यामुळे तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.