लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शेटे हे पक्ष नेतृत्वाने सुचविलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे देऊन जिल्ह्यात पक्षाचे अतोनात नुकसान करत असल्याबद्दल शेटे यांना जिल्हाध्यक्षपदावरुन तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ कुचेकर यांनी शुक्रवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी दि. १५ एप्रिल २०२४ रोजीच्या पत्रान्वये लातूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पत्रात कोणत्या तालुक्यातून कोणाला अध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, अशी पदे द्यावयाची आहेत, त्यांच्या नावाची यादीच जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केली होती. या यादीप्रमाणे नियुक्त्या करून त्याचा संपूर्ण अहवाल प्रदेश कार्यालयास पाठविण्याबाबत सूचित करण्यात आले होते. संजय शेटे यांनी प्रदेश पदाधिका-यांनी सांगितलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे न देता आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी त्या पदावर मनमानीपणे केली असल्याचे रघुनाथ कुचेकर यांनी सांगितले.
आम्ही सगळे शरदचंद्र पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात पक्षाचे नुकसान होता कामा नये, याकरिता जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांना पदावरून हटविण्याची मागणी करत आहोत. ही मागणी आपण पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडेही शिष्टमंडळाने जाऊन करणार आहोत. लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे पक्षनेतृत्वाला चुकीची माहिती देऊन निष्ठावंतांना डावलून कामे न करणा-यांना सोबत घेऊन चालत असल्याचा आरोपही यावेळी कुचेकर यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनीही आपली व्यथा मांडली. यावेळी नरेंद्र पाटील, अॅड. विनायक शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. सुरज साळुंके, मनोज कातळे, डॉ. बापूसाहेब पाटील, प्रमोद जाधव, व्यंकटराव रणखांब, रुपेश चक्रे, धनंजय चव्हाण, जयप्रकाश उजळंबे, राजेश मुगळे, महेश चव्हाण, शाहेद चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती.