लातूर : प्रतिनिधी
आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठान तसेच दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय, संगीत विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात स्वर्गीय उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित ‘ताल समर्पण’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे कोलकत्ता येथील जगप्रसिद्ध महिला तबलावादक विदुषी रिंपा शिवा यांचे स्वतंत्र तबला वादन होणार आहे. त्यांना लहरासाथ कोलकत्ता येथील योगेश रामदास हे संवादिनीवर करणार आहेत.
ही १२० वी आवर्तन मासिक संगीत सभा आहे. पाहता पाहता या सांगीतिक चळवळीस दहा वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी या जगविख्यात कलावंत रिंपा शिवा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आजपर्यंत केवळ अभिजात संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी आवर्तन प्रतिष्ठान कार्यरत आहे. आजपर्यंत अनेक दिग्गज कलावंतांनी या संगीत सभेत आपल्या गायन वादन व नृत्याची मेजवानी लातूरकरांना दिलेली आहे. या संगीत सभेचा मूळ हेतू म्हणजे बुजुर्ग कलावंतांचे गायन वादन ऐकायला मिळावे.
नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळावे तसेच संगीत अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना कलावंतांचा सहवास व मार्गदर्शन मिळावे. याबरोबरच लातूर येथील रसिकांना सातत्यपूर्ण शास्त्रीय संगीत ऐकावयास मिळावे हाच आहे. हा ताल समर्पण संगीत समारोह समस्त लातूरकर कलावंतांच्या वतीने जगविख्यात तबलावादक स्वर्गीय झाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात येणार आहे. सर्व रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रवेशिका रिअल हनी शॉप नंदी स्टॉप या ठिकाणी उपलब्ध असतील.
या संगीत समारोहासाठी सर्व रसिकांनी व संगीत साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, कार्यक्रम नियोजन समिती प्रमुख विशाल जाधव तसेच समस्त आवर्तन परिवार व दयानंद कला महाविद्यालय संगीत विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.