24.5 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeलातूररेणा प्रकल्पात ४३० दलघमी अतिरिक्त पाणीसाठा

रेणा प्रकल्पात ४३० दलघमी अतिरिक्त पाणीसाठा

रेणापूर : प्रतिनिधी
रेणा मध्यम प्रकल्पातून गाळाचा उपसा करण्यात आल्यामुळे धरणात ४३ कोटी लिटर (०.४३० दलघमीटर) अतिरिक्त पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे तर  रेणा नदीवरील चार बॅरेजेसमध्ये १.१६९ दलघ मीटर पाणी साठा आहे. या पाण्यामुळे धरण परिसरातील १ हजार २०० तर रेणा नदी काठालगतच्या ३५० असे जवळपास १ हजार ५५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कांही शेतकरी या पाण्याचा वापर शेती पिकासाठी करीत आहेत.
     रेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने अपेक्षीत पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे धरणातील जलसाठा लवकर संपत असतो. परिणामी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर्षी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत ७ जून २०२४ अखेर धरणातून ४ लाख ३० हजार ५०० घनमिटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. गाळ काढल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. शिवाय खडकाळ जमिनीवर गाळ टाकल्यामुळे या जमिनी सुपीक होऊन पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागून धान्य उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.
     मागील दोन-तीन वर्षात रेणा मध्यम प्रकल्पात जलसाठा उपलब्ध नव्हता त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने सिंचन क्षेत्रात मोठी घट झाली होती. पाणी उपश्यावर प्रशासनाने बंदी घातली होती. यावर्षी रेणा धरणात व रेणा नदीवरील रेणापूर, घनसरगांव, जवळगा,  खरोळा या बॅराजमध्ये सध्या मुबलक जलसाठा उपलब्ध आहे.या पाण्याच्या भरवश्यावर सध्या शेतकरी नवीन ऊसाची लागवड करीत आहेत तर रब्बीच्या पिकांनाही या पाण्याचा मोठा फायदा होत आहे. नदीवरील बॅराजसमधील गाळ काढला तर अतिरिक्त पाणी साठून नदीकाठचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे.
रेणा धरणातील गाळाचा उपसा शेतक-यांनी स्वखर्चाने केला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. या साठवण क्षमतेमुळे शेतक-यांच्या विहिरी व बोअरच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. शेतावर गाळ टाकल्यामुळे खडकाळ , मुरमाड व माळरानावरील जमिनी सुपीक बनल्या असून त्या कसदार होण्यास मदत झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR