रेणापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे काम करण्यात येत आहे. तालुक्यात मंगळवारी दि २३ रोजी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून प्रगणक घरोघरी जाऊन १९० प्रश्नांची माहिती भरून घेत आहेत.
या सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टीट्यूटने ऍप तयार केलेल्या सॉफ्टवेअरवर माहिती संकलित करावयाची असल्याने कामासाठी सर्वेसाठी ४४७ आणि राखीव ८९ असे ५३६ प्रगणक व पर्यवेक्षक ८० व राखीव १० असे ९० पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रगणक व पर्यवेक्षक यांना उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, अनुप पाटील, तहसिलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड व नायब तहसीलदार श्रवण उगले, सुभाष कानडे यांनी रविवारी (दि. २१) रोजी प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन केले.
त्यानुसार रेणापूर तालुक्यात मंगळवार दि २३ रोजी सर्वेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला असून गावोगावी जाऊन प्रगणक साफ्टवेअरमध्ये माहिती संकलित करीत आहेत. हे सर्वेक्षणाचे काम येत्या ७ दिवसांत व अचुकपणे करावयाचे असल्याने उप विभागीय अधिकारी व तहसिलदार, नायब तहसिलदार गावोगावी जाऊन भेटी देत नागरीकाला सहकार्याचे आवाहन करीत आहेत. या सर्वेक्षणाच्या कामात तलाठी, मंडळ अधिकारी पोलिस पाटील व कोतवाल हे सहकार्य करीत आहेत . रेणापूर तालुक्यात पहिल्याच दिवशी अडीच ते तीन हजारांच्या जवळपास सर्वे करण्यात आला
आहे.