19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeउद्योगलष्कराचा ८५% भांडवली खर्च स्वदेशी उत्पादनांवर

लष्कराचा ८५% भांडवली खर्च स्वदेशी उत्पादनांवर

पुणे : वृत्तसंस्था
भारतीय लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर होत आहे. संशोधन आणि विकास, उत्पादनासाठी पुण्याचे महत्त्व मोठे आहे. दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे लष्करासाठी ‘पॉवरहाऊस’ असल्याचे मत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले.

बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या संचलन मैदानावर झालेल्या सैन्य दिन कवायतीच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. द्विवेदी म्हणाले, दक्षिण मुख्यालय हे सर्वांत मोठ्या मुख्यालयांपैकी एक आहे. देशातील ११ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश असा एकूण ४१ टक्के भूभाग दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित येतो. नौदलाची तीन मुख्यालये, हवाई दलाची चार मुख्यालयेही दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आहेत. येत्या काळात दक्षिण मुख्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

यंदाच्या सैन्य कवायतीत पहिल्यांदाच सेना पोलिसांच्या महिला अग्निवीर आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणी यात सहभागी झाल्या होत्या. याबाबत बोलताना द्विवेदी म्हणाले की, विकसित भारतात नारीशक्ती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तसेच पुढच्या काळात भारतीय लष्करातही महिलांची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे.

पुढील वर्षी उद्योगांचाही समावेश
पुढील सैन्य दिन कवायतीसाठी गुवाहाटी, जयपूर, भोपाळ, जबलपूर अशी शहरे निवडली जाणार आहेत. लवकरच समिती नियुक्त करून आवश्यक सुविधांची उपलब्धता असलेल्या शहराची सैन्य दिन कवायतीसाठी निवड केली जाईल. पुढील वर्षी माजी सैनिक, संरक्षण उत्पादन करणारे उद्योग यांनाही सहभागी करून घेण्याचा विचार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR