21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’ वरून घुमजाव!

‘लाडकी बहीण’ वरून घुमजाव!

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली होती. महायुतीने विधानसभा निवडणुकीत १५०० रुपयांची ही रक्कम २१०० रुपये करणार, असे आश्वासन दिले होते. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून यामध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणांना २१०० रुपये पुढील वर्षी भाऊबीजेपासून वाढीव रक्कम मिळू शकते, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देणार हे आश्वासन महायुतीने देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करु. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशाभरात खराब होईल. निवडणुका झाल्या की, आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत, अशी आमची प्रतिमा होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. आपण शब्दावर ठाम राहायला हवे. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. ती आश्वासन धुळीस मिळू देणार नाहीत. आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणांना २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. महायुतीतील एकही पक्ष आमच्या २१०० रुपये देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून १५०० रुपयांमध्ये वाढ करुन २१०० रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरु केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीणचे पैसे २१०० करणार एकनाथ शिंदे यांनी दिले होते आश्वासन
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून महाराष्ट्रातील जनतेला वारेमाप आश्वासन देण्यात आली होती. महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेची रक्कम ३००० रुपये करु, असे आश्वासन दिले होते. याशिवाय या योजनेला महालक्षी योजना हे नाव देणार असल्याचेही सांगण्यात आले होते. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आश्वासनांना काऊंटर करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली होती. आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० वरुन २१०० करु, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होते. दरम्यान, आता ही वाढीव रक्कम देण्यास सुरु करण्यासाठी भाऊबीज उजाडावी लागेल, याबाबतचे संकेत भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

जे व्याज भरतो, त्यापेक्षा ही रक्कम कमीच
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे तिजोरीवर ४५ हजार कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. आता १५०० रुपयांचे २१०० रुपये केल्यास सरकारी तिजोरीवर आणखी किती भार पडेल, असा प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर आपण जे व्याज भरतो, त्यापेक्षा ही रक्कम कमीच असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. दरवर्षी सातव्या वेतन आयोगावर आपण जितका खर्च करतो, त्यापेक्षाही ‘लाडकी बहिण’वरील खर्च कमीच आहे. महिलांना पैसे दिले जात असतानाच लोक असे प्रश्न का विचारतात, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

२१०० रुपये देण्याची राज्याची क्षमता
‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत येणा-या प्रत्येक महिलेला २१०० रुपये देण्याची राज्याची क्षमता आहे. आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी द्यायची त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. जानेवारीपासून रक्कम वाढवायची की जुलैपासून याचा निर्णय घेण्यात येईल. आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली होती. त्यामुळे आम्ही २१०० रुपये पुढील भाऊबीजेपासून देऊ शकतो, अशा शक्यता मुनगंटीवारांनी सांगितल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR