लातूर : प्रतिनिधी
लातूरचे भूमिपुत्र व स्व. पंडित शांताराम चिगरी यांचे पट्टशिष्य पंडित मुकेश जाधव हे युएसए दौ-यावर गेले असून युएसए मधील पाच देशात ते स्वतंत्र तबला वादन व जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्या बासरी वादनाला व गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गजलांना साथसंगत करणार आहेत. दिनांक ११ ते १९ सप्टेंबर पर्यंत ते युएसए मध्ये भारतीय अभिजात संगीताचा प्रचार व प्रसार करणार आहेत. ते न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिल्डेल्पिया, न्यू जर्सी, डेट्रॉईट व कोलंबस आदी शहरात तबला वादन व साथसंगत करणार आहेत.
बनारस, दिल्ली व फरुखाबाद या घराण्याची त्यांनी पंडित शांताराम चिगरी गुरुजींकडून तालीम घेतली आहे. दाया बायाचे संतुलन, बोलांची स्पष्टता, स्पष्ट व शुद्ध निकास, अति द्रुत लयीतील वादन यामुळे अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी तबलावादनातील आपले स्थान आढळ केले. यापूर्वी फ्रान्स, जपान, जर्मनी, इंग्लंड आदी विविध देशातून त्यांनी तबलावादन सादर केले आहे. त्यांच्या या युएसए दौ-याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, वडील श्रीपतराव जाधव, प्रा. डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. अंगद गायकवाड, संजय सुवर्णकार, सोनू डगवाले, मीनाक्षी कोळी, विजय श्रीमंगले, परमेश्वर पाटील व सुरताल परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.