बारामती : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्याची घोषणा करणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवतारे यांनी आज सासवडमध्ये ही घोषणा केली.
दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली.
यावेळी माध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी, ‘मी महिलांसमोर उत्स्फूर्तपणे बोललो. ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रियाही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली.
मोदींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावलेही माझ्यावर. मला एक फोनही आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. १५ ते २० लोकसभा उमेदवार पडू शकतात. असं मला सांगण्यात आलं. यामुळे महायुतीला मोठा फटका बसणार होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे’, असं ते म्हणाले.
अजित पवारांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
शिवतारे यांनी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेतल्याने आता बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे.