आज कुणाची माथी कधी भडकतील याचा नेम नाही. म्हणून ‘तोल मोल के बोल’ ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. समाजाचे प्रत्येक क्षेत्र संवेदनशील बनले आहे. एखादी व्यक्ती जे काही बोलते, त्यामागे मतितार्थ काय हे जाणून घेण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. आपले जसे मत तसे त्याचेही मत असू शकते एवढा विचार करायलाही आपल्याकडे वेळ नाही, संयम तर नाहीच नाही. राजकीय क्षेत्रात तर संवेदनशीलतेला उधाणच आले आहे. समोरची व्यक्ती आपल्या मताशी सहमत नाही ना, मग झोडा त्याला अशी मानसिकता पराकोटीला पोहोचली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे विविध पक्ष तयारीला लागले आहेत.
प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या राज्यात संपर्क यात्रा, संवाद यात्रा, दौरे सुरू झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीबरोबर संधान साधण्यास सुरुवात केली होती. त्यांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देणे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वत:चे उमेदवार उभे न करता दिल्लीत अमित शहांना भेटून भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला त्याचा काहीच फायदा झाला नाही. भाजपला जर फायदा झाला असता तर भाजपचे बोट धरून मागच्या दरवाजाने मनसेचा एक खासदार दिल्लीला गेला असता. जनतेने भाजप-मनसे युतीला झिडकारल्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तो कितपत टिकतो याची खात्री नाही. सध्या राजकारणात कट-कारस्थानांचे स्तोम वरचेवर वाढत चालले आहे. ते पाहता सामान्य जनतेचा राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे असे दिसते. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.
सत्ता प्राप्त करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने शह-काटशहाचे राजकारण खेळले जात आहे. युती असो की आघाडी, त्यांच्यासमोर जागा वाटप हा महत्त्वाचा विषय आहे. जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला कशा येतील याकडे लक्ष दिले जात आहे. त्यात जिंकण्यासाठी लढवायच्या जागा आणि हरविण्यासाठी लढवायच्या जागा हा विषयही आहे. सर्व पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतली आहे. त्यांनी विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौ-यावर येताना सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. सोलापूरच्या दौ-यात त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रश्नावरही त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, इथे आरक्षणाची गरजच नाही.
पैशाचे व्यवस्थित नियोजन केले तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्र हे देशातील प्रगत सधन राज्य आहे. देशातील सर्वाधिक उद्योग, व्यवसाय महाराष्ट्रात आहेत. पायाभूत सुविधा, विकासाची कामे इथे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरज नाही. परराज्यातून येणा-या लोंढ्यामुळे शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई, ठाणे तसेच इतर शहरांमध्ये मोठे उड्डाणपूल झाले आहेत. या गोष्टी स्थानिक लोकांसाठी केल्या जात नाहीत तर बाहेरून येणा-या लोकांसाठी केल्या जात आहेत. आपल्या राज्यातील सर्वाधिक पैसा हा बाहेरून आलेल्या लोकांवर खर्च केला जात आहे. नसलेल्या सरकारी नोक-यांसाठी लोकांची माथी भडकवण्याचे काम केले जात आहे. मुळात नोक-याच शिल्लक नाहीत. त्यासाठी आरक्षणावरून लोकांमध्ये भांडणे लावली जात आहेत. राज्यातील उद्योग-व्यवसायातून निर्माण झालेल्या नोक-यांमध्ये मराठी माणसाला स्थान दिले जात नाही हे मूळ दुखणे आहे.
मराठी माणसाला प्रथम प्राधान्य देण्यात आले तर आरक्षणाची गरज काय असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आरक्षणातून किती नोक-या आणि उच्च शिक्षणाच्या संधी मिळाल्या हे तपासण्याची वेळ आली आहे असे सांगून राज ठाकरे म्हणाले, राजकारणी मंडळी लोकांच्या खांद्यावर आरक्षणाची बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधत आहेत. हा सारा विष कालवण्याचा प्रकार असून त्याचे लोण थेट शाळा-महाविद्यालयापर्यंत पोहोचले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा मणिपूर होण्यासाठी शरद पवार यांनी हातभार लावू नये. आरक्षणासंबंधी राज ठाकरे यांनी मतप्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर मिळणार हे उघड होते. संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज ठाकरे यांना आरक्षणातील काही कळत नाही. त्यांना त्यांचे मित्र भडकवत आहेत. मराठ्यांना दोष देण्याचे काम तुम्ही करू नका.
आरक्षणाविरुद्ध घेतलेली भूमिका राज ठाकरे यांनी कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवारावर दलित, आदिवासी, ओबीसी, बहुजनांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘तुम्ही खरेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का?’ असा संतप्त सवाल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला. प्रबोधनकारांच्या घरी जन्म घेऊन राज ठाकरे बेजबाबदार आणि असंवैधानिक वक्तव्य करीत आहेत याची कीव करावीशी वाटते असे हाके म्हणाले.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर धाराशिवमध्ये तीव्र प्रतिसाद उमटले. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा असा आग्रह धरत मराठा आंदोलकांनी ठाकरे यांच्या विरोधात सुमारे साडेतीन तास आंदोलन केले. जालना जिल्ह्यातील मंठा येथे राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचे पुतळेही जाळण्यात आले. कोणत्याही वादाच्या निषेधार्थ फोटोला जोडे मारणे, पुतळा जाळणे हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. वाद हा संवादाद्वारेच मिटायला हवा.