मुंबई : प्रतिनिधी
मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय झाला असे म्हणणरे काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दिकी थेट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत एकाच मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाईंनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वांद्रे पूर्व मतदारसंघातून दोघेही संभाव्य उमेदवार आहेत.
आपल्याला मतदारसंघात कामात अडथळे आणण्याचा आणि काम करू देत नसल्याचा शिवसेना ठाकरे गटावर आरोप करणारे वांद्रे पूर्वचे स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी थेट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसमोर या कार्यक्रमात पाहायला मिळाले. याच कार्यक्रमाला रामदास आठवले यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब देखील उपस्थित होते.
दोन संभाव्य उमेदवार एकाच मंचावर
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता असणारे आणि तशी तयारी करणारे दोन संभाव्य उमेदवार एकाच कार्यक्रमात एकाच मंचावर या निमित्ताने पाहायला मिळाले. वांद्रे पूर्वमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आमदार झिशान सिद्दिकी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे ‘मातोश्री’च्या अंगणात संभाव्य उमेदवारांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.