रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करणा-या तालुक्यातील वसंतनगर तांडा व गससुळी तांडा येथील ४ अड्ड्यावर धाड टाकून जवळपास १ लाख २४ हजार रुपये किमतीचे १४ बॅरल व २ हजार ४४० लिटर हातभट्टी दारू तसेच रसायन जप्त करून जागेवरच नष्ट केले असल्याची घटना रविवारी दि ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याची सुमारास घडली. याप्रकरणी चार जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
रेणापूर तालुक्यातील वसंतनगर तांडा व गरसुळी तांडा शिवारात हातभट्टी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच अवैद्य धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ जाधव, हाणमंत घुले, पोलीस कर्मचारी विपीन मामडगे किरण मडोळे, जाधव विष्णु मुंडे, गिरी मोगले, राजेंद्र यादव, मुन्ना मदने, गायकवाड, घोगरे, जोडपे, कांबळे, सारोळे, पंडगे, महिला अंमलदार कांबळे, पठाण, यांच्या पथकाने वंसतनगर तांडा येथे दोन ठिकाणी रविवारी दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून १२ बॅरलमधील २ हजार ४०० लिटर हातभट्टीची दारु अंदाजेकिंमत १ लाख २० हजार रुपयांची जप्त करून नष्ट केली तर गरसुळी तांडा येथे दोन ठिकाणी धाड टाकून ४० लिटर गावटी दारु अंदाजे किमंत ४ हजार रुपयांची नष्ट केली.
याप्रकरणी सुखदेव राठोड, दिलीप राठोड दोघे रा वसंतनगर तांडा तर संगिता राठोड, सुदाम राठोड दोघे रा.गरगुळी तांडा यांच्याविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.