22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयवाढता वाढे नक्षलवाद!

वाढता वाढे नक्षलवाद!

जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत व नक्षलग्रस्त राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यश आले असले तरीही दहशतवाद, घुसखोरी आणि धार्मिक तणाव निर्माण करणा-या कट-कारस्थानाविरोधात लढा सुरूच राहील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. असे असले तरी दहशतवाद पूर्णत: संपुष्टात आल्याचे दिसत नाही, तो मधूनच हळूच डोके वर काढताना दिसतो. नक्षलवादाबाबतही तोच प्रकार आहे. जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सोमवारपासून जोरदार तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गांदरबल जिल्ह्यात श्रीनगर-लेह महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक डॉक्टर आणि सहा मजूर ठार झाले. रविवारचा हल्ला बिगरकाश्मिरींवर झालेल्या सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असल्याचे अधिका-यांनी सांगितले. यापूर्वी जून २००६ मध्ये दहशतवाद्यांनी बिहार आणि नेपाळमधून आलेल्या मजुरांना ठार केले होते. महाराष्ट्रात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने नक्षलवाद्यांकडून घातपाताचे प्रयत्न होतील हे गृहित धरून नक्षलवादी भागात पोलिस दलाला अलर्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील कोपर्शी जंगलात नक्षलवादी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवादविरोधी अभियान राबविण्यात आले होते. पोलिस जवान या जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच नक्षलवादी ठार झाले. गत काही महिन्यांपासून देशातील मध्यवर्ती राज्यात असलेल्या नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी आणि कठोर मोहीम राबवल्याने १५४ नक्षलवादी मारले गेले आहेत. २०२६ पूर्वी देशातील नक्षलवादाचा अंत होईल. त्याविरुद्धची मोहीम आता निर्णायक वळणावर आणि शेवटच्या टप्प्यात आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते २००४ ते २०१४ दरम्यान नक्षलवादी आक्रमणाच्या १६ हजार २७४ घटना घडल्या. नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाने छत्तीसगडमधील बखर जिल्ह्यात ४ हजारहून अधिक जवान तैनात केले. भारतात नक्षलवादाचा प्रारंभ बंगालमध्ये १९६० च्या दशकात झाला. नक्षलवाद्यांना ‘माओवादी’ असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात माओवाद्यांचे क्रौर्य आणि चीनशी असलेले संबंध लपवण्यासाठी त्याला ‘नक्षलवाद’ असे नाव देण्यात आले. नक्षलवादाची स्वत:ची वेगळी अशी विचारसरणी नाही. बंगालमधील नक्षलवादी गावात चारू मुजूमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे ‘नक्षलवाद’ असे संबोधले जाऊ लागले.

१९७०च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केले. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली. ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेक वेळा प्रयत्न झाला. गत काही वर्षांत नक्षलवाद्यांचे अनेक गट तयार झाले. झारखंड, बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि आंध्र प्रदेश या भागात नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. देशात ११ राज्यांतील ९० जिल्ह्यांत ही चळवळ पसरली आहे असे सांगितले जाते. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ६ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या चळवळीतील बंडखोरांच्या मते ते स्थानिक आदिवासींच्या हक्कासाठी आणि ज्यांच्याकडे सरकारने लक्ष दिले नाही अशा लोकांच्या हक्कासाठी लढत आहेत. नक्षलवाद ही देशाच्या एकतेला आणि अखंडतेला लागलेली कीड आहे. याचे असंख्य पुरावे नक्षलवाद्यांच्या प्रकाशित साहित्यातून समोर येत आहेत, तरीही त्यांची बाजू घेऊन भांडणारा तथाकथित बुद्धिवाद्यांचा मोठा वर्ग देशात आहे हे देशाचे दुर्भाग्यच म्हटले पाहिजे. येथील लोकशाही राज्यव्यवस्थेचे सर्व लाभ पदरात पाडून घेत, रक्तरंजित क्रांतीची स्वप्ने पाहणा-यांची पाठराखण हे तथाकथित बुद्धिवादी करत आहेत. अशा शहरी(अर्बन) नक्षलवाद्यांविरुद्ध सरकारने कारवाई केली पाहिजे.

भारतातील नक्षलवादी चळवळ ही जगातील चौथ्या क्रमांकाची दहशत पसरवणारी आहे, असे २०१८ च्या अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. दहशतवादासमवेत नक्षलवाद हेही देशापुढील मोठे आव्हान आहे. नक्षलवाद्यांनी सरकारला विकासकामे करू न दिल्याने तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत. समाजाच्या प्रवाहात येऊ इच्छिणा-या तरुणांना नक्षलवाद्यांनी दहशतीच्या जोरावर वेठीस धरले आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळ ख-या अर्थाने देशभरातील सामाजिक, राजकीय व्यवस्थेला प्रभावित करणारी आणि लोकशाही व्यवस्थेची पाळेमुळे खिळखिळी करणारी ठरली आहे. बंगालच्या एका लहान खेड्यात जन्माला आलेला नक्षलवाद आता खेड्याकडून महानगरांकडे वळला आहे. शहरी नक्षलवाद महाविद्यालय आणि वस्त्यापर्यंत पोहोचला आहे. नक्षलवादी चळवळीने ६ दशके पूर्ण केल्यानंतरही लोककल्याणासाठी भक्कम असा पर्याय उपलब्ध करून देण्यात ही चळवळ पूर्णत: अपयशी ठरली आहे.

गत ६ दशकांतील हिंसाचारामुळे नक्षलवाद्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे. चळवळीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातून लोकांचे स्थलांतर होऊ लागले आहे, शिवाय तरुण पिढी शिक्षण आणि नोकरीसाठी आग्रही आहे. यावरून नक्षलवाद्यांनी विश्वासार्हता गमावली आहे हे स्पष्ट होते. तथाकथित बुद्धिजीवी वर्ग नक्षलवादी बंड वा हिंसा योग्य असल्याचे सांगत एकप्रकारे लोकशाहीला आव्हान देत आला आहे हे विसरून चालणार नाही. हा वर्ग नकळतपणे नक्षलवाद्यांची पाठराखण करत आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाची अखंडता आणि वैभव टिकवून ठेवण्यासाठी सदैव जागरूक अन् सतर्क राहण्याची गरज आहे. चकमकीनंतर काही नक्षलवादी शस्त्रे खाली ठेवून शरण येतात, त्यांचे नंतर काय होते? असो. नक्षलवादाचा अंत जवळ येताना दिसतो, कारण त्याची फडफड अधिक वाढली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी नक्षलवाद समूळ नष्ट करावा लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR