लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथील विलास बागेत सार्वजनिक आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अभिजात भारतीय संगीत परंपरेतील आघाडीचे युवा गायक पंडित शौनक अभिषेकी यांचा भक्त्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आपल्या आयुष्य जगता यावे यासाठी आदरणीय विलासराव देशमुख यांनी कृषी, सहकार, शिक्षण उद्योग, व्यापार यासह विविध क्षेत्रात योगदान देऊन मोठे कार्य उभे केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनी बाभळगाव येथे होणा-या आदरांजली सभेस दरवर्षी राज्य आणि देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक यांची मोठी उपस्थिती असतात. आज बाभळगाव येथील विलास बागेत होणा-या या आदरांजली सभेच्या निमित्ताने या ठिकाणी सुप्रसिद्ध संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आणि अभिजात भारतीय संगीत परंपरेतील आघाडीचे युवा गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे पंडित शौनक अभिषेकी यांचा संतवाणी हा कार्यक्रम सादर होणार आहे.
अगदी लहान वयापासूनच आपल्या वडिलांचा शास्त्रीय संगीताचा पारंपारिक वारसा चालवणारे पंडित शौनक अभिषेकी हे शास्त्रीय संगीत, भ्क्तीसंगीत संतवाणी, नाट्यसंगीत या क्षेत्रात देश विदेशात सुपरीचित झाले आहेत, त्यांच्या या संतवाणी कार्यक्रमादरम्यान, संजय हिंगणे, पंकज शिरभाने, तुकाराम आव्हाड हे त्यांना संगीत साथ देणार असून संगीत संयोजन तालमणी डॉ. राम बोरगावकर हे करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, बाळकृष्ण धायगुडे करणार आहेत, आदरांजली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी बरोबर ९ वाजता होणार आहे. त्यामुळे सर्वांनी विलास बागेतील स्मृतीस्थळी सकाळी ठीक ८.५५ वाजन्यापूर्वी स्थानापन्न व्हावे, अशी नम्र विनंती देशमुख कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे.