नागपूर : विशेष प्रतिनिधी
महायुतीत विदर्भातील ६२ पैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सुमारे १२ विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देण्यात आले. उर्वरित ३५ पैकी तब्बल १९ मतदारसंघांमध्ये भाजपने कुणबी व इतर समाजातील उमेदवारांना संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. याची सरासरी टक्केवारी ५४.२८ इतकी आहे. या माध्यमातून बहुसंख्य कुणबी व मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात भाजपाने उमेदवारीत प्रतिनिधीत्व देऊन सामाजिक समीकरण साधल्याचा विश्वास समाज बांधवांमधून व्यक्त होत आहे.
विदर्भातील ओबीसी समीकरणांचा विचार करता कुणबी हा प्रमुख घटक आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील संपूर्ण ११ जिल्ह्यांमध्ये कुणबी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. यानंतर तेली, माळी, पोवार आणि इतर समाजाची संख्या आहे. हीच बाब लक्षात घेऊन लोकसंख्येच्या प्रमाणात कुणबी व मराठा समाजाला भाजपने उमेदवारीत प्रतिनिधीत्व दिले. उमेदवारांच्या प्रत्येक यादीत हे समीकरण कायम ठेवण्यात आले. केवळ योजनांच्या माध्यमातूनच नव्हे तर सत्तेतही त्यांना सहभागी करून घेण्यासाठी निम्म्याहून अधिक जागांवर कुणबी व मराठा उमेदवार दिले आहेत.
राहुल गांधींचा हा कुठल्या न्याय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचे वचन दिले. पण, विदर्भात बहुसंख्य असलेल्या कुणबी व मराठा समाजाला अपेक्षित संधी देण्यात आली नाही. हा कुठला न्याय आहे, अशा शब्दांत कुणबी समाजातील नेत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
पटोले, वडेट्टीवारांविरुद्ध ‘कुणबी अस्त्र’
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात भाजपने अविनाश ब्राह्मणकर आणि कृष्णलाल सहारे यांच्या रुपाने कुणबी उमेदवार दिले आहेत. पटोलेंच्या साकोलीत कुणबी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत होत आहे. पटोले यांनी समाजासाठी आजवर काय केले, असा सवाल करीत कुणबी समाज आपल्या भावना व्यक्त करीत असल्याने ब्राह्मणकर यांना समाजाचे बळ मिळू लागल्याचे चित्र आहे. ब्रह्मपुरीत सहारे यांच्यासाठी कुणबी समाज एकवटला असल्याने वडेट्टीवार यांनी अधिक लक्ष आपल्या मतदारसंघावर केंद्रीत केले आहे.