यवतमाळ : प्रतिनिधी
गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारने अनेक मदतीची घोषणाही केली. पण नुकसानग्रस्त शेतक-यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही मदत कधी मिळणार आणि आर्थिक संकट कधी दूर होणार, याची प्रतीक्षा शेतक-यांना लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात विदर्भात मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा अमरावती या पाचही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.
या पावसामुळे ३ लाख २३ हजार ८९ शेतक-यांच्या २ लाख ८० हजार ६४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या मदतीची घोषणा केली. त्यानुसार, नुकसानी भरपाईपोटी ३८६ कोटी २३ लाख ४८ हजार रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव अद्याप मान्य झालेला नाही.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शेतक-यांवरील आर्थिक संकट दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र, असे असले तरी, अजूनही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
त्यामुळे शेतक-यांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत त्यांना लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. याशिवाय, विरोधकांनी ही अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभेची निवडणूक आटोपून मंत्रिमंडळाची स्थापना झाली. मात्र महायुती सरकारने शेतक-यांना मदतीचा दिलेला शब्द अजूनपर्यंत पाळला नाही. लाडक्या बहिणीला मानधन कधी मिळेल याची माहिती सरकार देत आहे. पण शेतकरी आपल्या शेतात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मदत कधी मिळेल याकडे आस लावून बसला आहे. ही मदत नेमकी कधी मिळणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.