26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेच्या ४ जागांसाठी बुधवारी मतदान

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी बुधवारी मतदान

मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गट आणि भाजपात चुरशीची लढत

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या ४ जागांच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल महत्त्वाचा असल्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीने या ४ जागांसाठी जोर लावला आहे. आज, सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत ४ जागांसाठी मतदान होईल तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंती क्रमाने मतदान होते त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाणा-या सत्ताधारी महायुतीने मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत तर महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला आहे.

मुंबईत भाजपाचे आव्हान
गेली ३० वर्षे मुंबई पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजपाने या वेळी आव्हान दिले आहे. मुंबई पदवीधरमध्ये एकूण ८ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपाचे किरण शेलार यांच्यात होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात १२ हजार पदवीधर उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत, या अनिल परब यांच्या आरोपामुळे ही निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. मुंबईतील १ लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य आज निश्चित करतील.

मुंबई शिक्षकमध्ये चौरंगी लढत
मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपाचे शिवनाथ दराडे आणि शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे हे ५ प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत.

कोकण पदवीधरमध्ये सरळ लढत
कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होत आहे. निरंजन डावखरे हे तिस-यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील भाजपाची यंत्रणा लक्षात घेता काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदारांची नोंद झाली आहे.

नाशिक शिक्षकमध्ये २१ उमेदवार
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात शिंदे-पवार आमने-सामने
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून एकूण २१ उमेदवार विधान परिषद निवडणुकीसाठी आपले नशीब अजमावत आहेत. तथापि, मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे. विशेष म्हणजे येथे सत्ताधारी महायुतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे उमेदवार आमने-सामने उभे आहेत. विशेष म्हणजे येथे भाजपाने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात ६९ हजारांहून अधिक मतदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR