राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्नही मार्गी लागणार?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज भेट घेतली. या भेटीत विधानपरिषदेच्या सभापती निवडीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागा भरण्याबाबत काय करता येईल, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. या अधिवेशनातच सभापती निवड करण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्यासाठी भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकरही प्रयत्नशील आहेत.
विधानपरिषदेत जास्तीत जास्त संख्याबळ करण्यासाठी सर्व रिक्त जागा भरण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू आहेत. राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबतचा घोळ गेल्या ३ वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ सदस्यांची यादी पाठवली होती. परंतु राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे राज्यपालांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यांनी मागील यादी रद्द करून १२ सदस्यांची नवी यादी दिली. परंतु अद्याप त्यावरही शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही.
मविआच्या शिष्टमंडळाने
राज्यपालांची घेतली भेट
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. विधानपरिषदेतील सभापतीपद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहे, असे सांगण्यात आले. यावेळी राज्यपालांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात येईल, असे आश्वासन दिले.