छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये लागलेला निकाल अनेक राजकीय पक्षांना मान्य झालेला नाही. त्यामुळे बहुतांश पराभूत उमेदवारांनी त्यावर साशंकता व्यक्त केली. काही जणांनी तर फेरमतमोजणी करण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तर न्यायालयात जाण्याची शेवटची तारीख असताना तब्बल ३५ पराभूत उमेदवारांनी आक्षेप नोंदवत औरंगाबाद खंडपीठात धाव घेत दाद मागितली आहे.
राज्यात अनेक मतदारसंघांत धक्कादायक पराभव मातब्बर उमेदवारांना स्वीकारावे लागले. त्यातील काही जणांनी खंडपीठात धाव घेतली. यामध्ये कैलास गोरंट्याल (जालना) यांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात, सर्जेराव मोरे (लातूर) यांनी रमेश कराडांविरोधात, प्रवीण चौरे यांनी मंजुळा गावित यांच्या विरोधात, महेबूब शेख (आष्टी, जि. बीड) यांनी सुरेश धस यांच्या विरोधात, राजेश टोपे (घनसावंगी) यांनी हिकमत उढाण यांच्या विरोधात, राम शिंदे (कर्जत) यांनी रोहित पवार यांच्या विरोधात, राजू शिंदे (छत्रपती संभाजीनगर-पश्चिम) यांनी संजय शिरसाटांविरोधात याचिका दाखल केली आहे.
बीडच्या केज मतदारसंघातील पराभूत उमेदवार पृथ्वीराज साठे (केज) यांनी नमिता मुंदडा यांच्या विरोधात, बबलू चौधरी (बदनापूर) यांनी नारायण कुचेंविरोधात, चंद्रकात दानवे (भोकरदन) यांनी संतोष दानवे यांच्या विरोधात, बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांनी अमोल खताळ पाटील यांच्या विरोधात, सतीश पाटील (पारोळा) यांनी अमोल पाटील यांच्या विरोधात याचिका सादर केल्या आहेत. याशिवाय राणी लंके, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, जयप्रकाश दांडेगावकर, राहुल मोटे, संदीप वर्पे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील आदींनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत.
‘ईव्हीएम’बाबत पराभूत उमेदवारांना संशय
विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागल्यावर इव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात आला. पराभूत उमेदवारांनी काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. काही जणांनी मशिनमधील आकडे आणि प्रत्यक्षात असलेले आकडे यात तफावत असल्याचा आक्षेप नोंदवला. याबाबत निवडणूक आयोगाकडे बहुतांश पराभूत उमेदवारांनी तक्रारी केल्या. त्याचप्रमाणे व्हीडीओ, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीची मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने त्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
फेरमतमोजणी अद्याप नाहीच
नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी काट्याची टक्कर झाली. काही मतांनी पराभव झालेल्या अनेक उमेदवारांनी तर काही भागात पडलेली मते अमान्य असल्याचे सांगत यंत्रात दोष असल्याचा आक्षेप नोंदवला. तर फेरमतमोजणी घेण्याची मागणी करत नियमाने पैसे भरून अर्ज केले. अद्याप त्यावर कुठलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे न्यायालयात दाखल या याचिकांवर काय निर्णय होतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे