मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ५० टक्के उमेदवार ठरले आहेत. मात्र भाजपने निश्चित केलेल्या या उमेदवारांना दस-यानंतर फोनवरून कळवले जाईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात चांगलाच फटका बसला होता. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजप सावध पावले टाकत आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि गणेशोत्सवानिमित्त नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौरा केला. या दौ-यादरम्यान शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या नेत्यांशी आगामी निवडणुकांसदर्भात चर्चा केली. यावेळी महायुतीतील जागावाटपाबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई दौ-यात शहांनी लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले. बाप्पाच्या दर्शनासाठी गृहमंत्री आवर्जून मुंबई दौ-यावर येतात. दरम्यान त्यांच्या दौ-यावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शहा लालबागच्या राजालाही गुजरातला नेतील असा खोचक टोला लगावला होता.
महायुतीत २५ जागांवर होणार मैत्रीपूर्ण लढत?
दरम्यान, या बैठकीदरम्यान भाजप नेत्यांनी अमित शहांसमोर एक प्रस्तावही मांडला. या प्रस्तावानुसार,येत्या विधानसभा निवडणुकीत २५ जागांसाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये मतभेद आहेत. यात इंदापूर, अमरावतीसह काही जागांचा समावेश आहे. यामुळे महायुतीत मतभेद वाढू नयेत, यासाठी या २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असा प्रस्तावही भाजपकडून या बैठकीत मांडण्यात आला आहे. मात्र यावर शिंदे गट आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.