मुंबई : प्रतिनिधी
सध्या केंद्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विनोद तावडे यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सुद्धा कौतुक केले. तब्येत बरी नसतानाही या निवडणुकीत सर्वाधिक कष्ट उद्धव ठाकरे यांनी घेतले असे ते म्हणाले.
‘मोहनजी भागवत हे काय बोलले मला माहीत नाही. ते आमचे पालक आहेत. पालकत्वाच्या नात्याने त्यांनी काही सांगितले असेल, तर आम्ही त्याचा विचार करू’’ असे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. विनोद तावडेंबद्दलही चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले. ‘विनोद तावडे हे पक्षाच्या सरचिटणीस पदापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी आजपर्यंत दिली, ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षात आता मोठी संधी दिली जाऊ शकते. ती संधी सुद्धा ते यशस्वीपणे पार पाडतील’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
ती जबाबदारी कोणती असेल? याबाबत चंद्रकांत पाटील जास्त खोलात गेले नाहीत. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी उध्दव ठाकरेंचे सुद्धा कौतुक केले. ‘‘तब्येत बरी नसतानाही या निवडणुकीत सर्वाधिक कष्ट उद्धव ठाकरे यांनी घेतले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. त्याचवेळी ते असेही म्हणाले की, युती तोडून उद्धव ठाकरेंनी काय मिळवले? १८ जागांवरून नऊ जागा आल्या. शिवाय अल्पसंख्याकांच्या जीवावर निवडून आले हा ठपका पडला आणि पक्षाची वाताहत झाली ते वेगळेच. उद्धव ठाकरेंसोबत असणारे एकवरून तेरावर गेले. पवार यांनीही आपला फायदा करून घेतला’’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भात काय म्हणाले?
भाजपमध्ये एकावेळी अनेक जबाबदा-या शक्यतो दिल्या जात नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. येत्या काळात तीन मोठ्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जे. पी. नड्डा यांच्यावर पुढच्या तीन महिन्यांसाठी जबाबदारी कायम ठेवली जाऊ शकते. हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.