छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत. महायुतीला राज्यात विक्रमी बहुमत मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजप गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. तिस-यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी त्यांनी मराठवाड्यासाठी दहा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
मराठवाडा हा महाराष्ट्रातील मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. येथील पर्जन्यस्थिती राज्यातील इतर पाच विभागांच्या तुलनेत वाईट आहे. त्यासोबतच औद्योगीकरण देखील मोठ्या प्रमाणात नाही. यामुळे येथील तरुणांना शिक्षण आणि रोजगारासाठी पुणे, मुंबईला जावे लागते. या सर्व पार्श्वभूमींचा विचार करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे होऊ घातलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना मराठवाड्याच्या विकासाबद्दलच्या १० मागण्या केल्या आहेत.
जायकवाडी धरणाच्या कालव्यांची जलवहन क्षमता निम्म्यापेक्षा खाली गेली आहे. या कालव्यांचे पुनरुज्जीवन करून पाण्याची गळती शून्यावर आणत नासाडी रोखावी, पाटबंधारे विभागात रिक्त असलेल्या पदांची सरळ भरती करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, छत्रपती संभाजीनगर-नगर-पुणे अॅक्सेस कंट्रोल्ड महामार्ग केवळ कागदावर नको, तो प्रत्यक्षात यावा. संभाजीनगर-नगर-पुणे या विद्यमान मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दुमजली रस्तेनिर्मिती व्हायला हवी.
जालना- नांदेड दरम्यान अॅक्सेस कंट्रोल्ड महामार्ग निर्मितीच्या कामाचा आरंभ आणि त्याचे लोकार्पण विद्युतगतीने व्हायला हवे. ऑरिक-बिडकीनच्या दुस-या टप्प्याचे भूमि अधिग्रहण आणि किमान दीड लाख कोटींची गुंतवणूक मराठवाड्यात द्यावी. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपल्या आश्वासनाप्रमाणे ‘तीन महिन्यांत’ शहरवासीयांना दररोज पाणी द्या. मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकी शहरे उरली आहेत जिथे नागरिकांना दरदिवशी पाणी मिळते. मराठवाड्यातील तमाम शहरांच्या पाणीप्रश्नावर तातडीने उपायोजना हव्यात आणि कालबा पाणीपुरवठा योजना बाद करून नागरिकांना दरदिवशी पाणी देण्याची तजवीज करावी.
पर्यटकांची वाढती संख्या पाहता छत्रपती संभाजीनगरला उदयपूर, बोधगया आदी ठिकाणांशी जोडण्याकरिता विमानांची अधिक उड्डाणे द्या. घृष्णेश्वर, परळी आणि औंढा नागनाथ ही ज्योतिर्लिंगे महाराष्ट्राचाच भाग आहेत. देशातील अन्य ज्योतिर्लिंग मंदिरांच्या धर्तीवर इथेही विशेष निधी देऊन विकासकामे हाती घ्यावीत. विदर्भातील ‘मिहान’च्या शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांना इथे येऊन स्थलांतराच्या नावाखाली प्रलोभने देऊ नयेत.