बीड : विशाळगड गजापूर याठिकाणी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (१९ जुलै) बीडमधील केजमध्ये दुपारची नमाज अदा केल्यानंतर हजारो मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विशाळगड गजापूर येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला. बीडमधील बशीरगंज चौकात ‘एमआयएम’च्या वतीने शुक्रवारी विशाळगड-गजापूर हिंसाचाराच्या निषेधार्थ निदर्शने केली. गेवराई आणि बीडमधील बशीरगंज याठिकाणी मुस्लिम बांधवांनी हातात काळे झेंडे घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘सरकार आणि प्रशासन मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
अनेकांच्या हाती तिरंगा ध्वज आणि निषेध करण्यासाठी काळे झेंडे, डोक्याला काळ्या पट्ट्याही लावल्या होत्या. मुस्लिम समाजाला, त्यांच्या धार्मिक स्थळांना आणि मुस्लिम घरांना लक्ष्य करणा-या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करा, या हल्लेखोरांविरुध ‘यूएपीए’ अंतर्गत कारवाई करा, मुस्लिम समाजाला संरक्षण द्या, अशीही मागणी यावेळी संतप्त जमावाकडून करण्यात आली. केजमध्येही मुस्लिम समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यात आला. संपूर्ण केजमध्ये शुकशुकाट होता.
गेवराईत मुर्दाबाद, मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्याचवेळी या हल्ल्यात नुकसानग्रस्त लोकांना तात्काळ मदत करून घटनेला जबाबदार असणा-यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.