लातूर : प्रतिनिधी
वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज असून, वृक्षांचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने साकारलेला वृक्षरुपी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर पर्यावरण बाबतीत जनजागृती करीत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
वसुंधरा प्रतिष्ठानच्या राजीव गांधी चौकात असलेल्या वृक्षरुपी गणेशोत्सवची आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. ‘देव दगडात नाही, देव देवळात नाही तर देव झाडात आहे’ अशी टॅग लाईन घेऊन वसुंधरा प्रतिष्ठानने २०१६-१७ पासून चक्क झाडाचा गणपती लातुरात साकारला. दरवर्षी साकारणारा हा आगळा वेगळा गणेशोत्सव सर्वांचे आकर्षण ठरतो आहे. यंदा झाडातून साकारलेला गणराय स्वत: पिंपळ वृक्ष लावतोय असा देखावा सादर करण्यात आला आहे.
हा वृक्षरुपी गणराय पाहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आहे. या गणेशोत्सवाची आरती मंगळवारी रात्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाली. यावेळी त्यांचा मंडळाच्या वतीने त्यांचा तुळस रोप देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणेश देशमुख यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.