20 C
Latur
Sunday, November 17, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार गटाच्या नेत्याकडून ब्लॅकमेलिंग

शरद पवार गटाच्या नेत्याकडून ब्लॅकमेलिंग

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मला ब्लॅकमेल करत असून २५ लाखांची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून महाविकास आघाडीमध्येच वादंग रंगण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुनील व-हाडे यांनी मला २५ लाख रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल केले असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या व तिवसा मतदारसंघाच्या मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सुनील व-हाडे हे स्वत:च्या फायद्यासाठी सगळं करतात. पक्षाच्या हिताचे काम सुनील व-हाडे करत नाहीत. ते व्यापारी आहेत त्यामुळे मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

सुनील व-हाडे यांनी २५ लाख रुपये द्या मी प्रचार करणार नाही. दवाखान्यात अ‍ॅडमिट होतो असे म्हटले असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला. दुसरीकडे व-हाडे यांनी यशोमती ठाकूर यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत तसेच मी यशोमती ठाकूर यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असून मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया सुनील व-हाडे यांनी दिली.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील तेवासा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून यशोमती ठाकूर या चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. यशोमती ठाकूर यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून राजेश वानखेडे यांचे आवाहन आहे. २०१९ मध्ये यशोमती ठाकूर यांनी सलग तिस-यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारत तिस-यांदा आमदारकी मिळवली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR