मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी राष्ट्रवादीच्या (एसपी) अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले, लग्नाआधी त्यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासमोर एकच मूल असावे, अशी अट ठेवली होती. मुलगा असो मुलगी एकच मूल होईल, ही अट प्रतिभा यांनी मान्य केली. ४४ वर्षांपूर्वी एकच मुलगी असण्याचा निर्णय घेणे खूप अवघड होते. पण त्यांनी ते करून दाखवले. खुल्या कुटुंबात जन्मलेल्या सुप्रिया यांना लहानपणापासूनच स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. शरद पवार यांनी कधीही सुप्रिया सुळे यांना शिक्षण असो की लग्न यासाठी दबाव निर्माण केला नाही.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी भारतातीलच काही डॉक्टरांकडे जाण्याचा शरद पवारांना सल्ला दिला. कर्करोगावर मात करण्याकरिता कृषिमंत्री असताना त्यांना ३६ वेळा रेडिएशन उपचार घ्यावे लागले. उपचारासाठी शरद पवार हे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत मंत्रालयात काम करायचे. दुपारी अडीचनंतर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घ्यायचे. एका डॉक्टरांनी पवारांना केवळ सहा महिने आयुष्य राहिले, असे सांगितले. तसेच तंबाखूचे सेवन बंद करण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवार यांनी आजाराची काळजी करू नका, असे सांगितले. सहा महिनेच आयुष्य सांगणारे डॉक्टर जिवंत नाहीत, असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले.
आमदार ते महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री
१९६७ मध्ये शरद पवार २७ वर्षांचे असताना बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाच्या प्रश्नांना वाचा फोडली. शंकरराव चव्हाण यांच्या १९७५-७७ च्या सरकारमध्ये शरद पवार गृहमंत्री होते. वयाच्या ३८ व्या वर्षी, शरद पवार यांनी जनता पक्षासह सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस (यू) सोडली. ते १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले.
१९८८ मध्ये शरद पवार दुस-यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९९१ मध्ये शरद पवार पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. २००४ मध्ये ते यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कृषिमंत्री झाले.