लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात पायाभूत विकास कामांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक कामे मंजूर आहेत. काही योजनांवर काम सुरू आहे तर काही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या योजनांना निधी मिळणार आहे त्यामुळे येत्या काळात लातूर शहरात पायाभूत विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेली दिसतील. येत्या काळात लातूर-मुंबई प्रवास ४ तासांत ताशी १२० कि. मी, वेगाने आराखडा तयार होत आहे. या कामांसह विविध विकास कामे लवकर होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर विधानसभा मतदार संघामध्ये प्रभाग क्रमांक १३, १४, १५ आणि ९ या प्रभागांमध्ये आयोजित रॅलीत ते बोलत होते. या वेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, नगरसेवक सुनील पाटील, पप्पू देशमुख, व्यंकटेश पुरी, माजी महापौर स्मिता खानापुरे आदींसह आजी, माजी नगरसेवक, पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, लातूर शहरामध्ये विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, विलासराव देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विलासराव देशमुख स्त्री रोग रुग्णालय, ७० नागरी आरोग्य केंद्र आहेत. हे सर्व काँग्रेसने केले. लातूरला दररोज पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.
शहरामध्ये ५०० कोटी रुपयांच्या जल वाहिनीचे काम झाले आहे. मलनिस्सारण योजनेकरिता साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी खर्च करून पहिल्या टप्प्यात काम पूर्णत्वास जात आहे. येणा-या काळामध्ये दुस-या टप्प्यातील निधी मंजूर असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विरोधकांनी काहीही केलेले नाही. आपण जागरूक राहायचे आहे. लातूर-मुंबई ४ तासांत १२० किलो मीटर ताशी वेगाने जाण्यासाठी लातूर ते कल्याण अशा नव्या रस्ताचा आराखडा तयार होत आहे. कल्याणपासून हा रस्ता सुरू होऊन लातूरला त्याचा शेवट होणार आहे. अशी विविध कामे आपल्याला येणा-या काळामध्ये करायची आहेत. विरोधक तुमच्याकडे येतील, तुमची दिशाभूल करतील; पण तुम्ही त्यांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. येत्या २० तारखेला इव्हीएम मशिनवरील क्रमांक एकचे बटन अमित विलासराव देशमुख यांच्या हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
या रॅलीचा शुभारंभ खाडगाव रोड येथून सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आला. ही रॅली पुढे खाडगाव रोड, हिप्परकर कॉम्प्लेक्स, गणेश चौक ते महसूल कॉलनी, जुना औसा रोड, श्रीराम चौक, दादाजी कोंडदेवनगर, केदारनाथ शाळा, लगसकर बिल्ंिडग ते देशमुख हॉस्पिटल, आदर्श कॉलनी कमान, कम्युनिटी हॉल, नारायणनगर, सीताराम चौक, अष्टविनायक मंदिर, शिवनगर ठाकरे चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.