मानवत/प्रतिनिधी
जनतेच्या समस्या व परिसरातील भौतिक विकास करण्यासाठी जनसेवेचा वसा हाती घेतला आहे. विकास हीच प्राथमिकता ठेवून जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी आदित्य पार्क परिरातील नवीन वसाहत रास्ता उद्धघाटन प्रसंगी केले.
शहराच्या प्रभाग क्रमांक ९ मधील आदित्य पार्क परिसरात नवीन वसाहत झाली आहे. त्या वसाहतीस जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यामध्ये ब-याच नागरिकांना चिखल तुडवीत आपली घरे गाठावी लागत असत. या ठिकाणी रस्ता व्हावा अशी मागणी या नागरिकांची होती. त्या मागणीचा विचार करून युवा नेते डॉ. लाड यांनी रस्ता कामासाठी निधी उपलब्ध केला. या रस्त्याचे उदघाटन ७ जुलै रोजी येथील नागरिकांच्या उपस्थितीत डॉ. लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक अॅड. किरण बारहाते, आई इंग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष राम घटे, मुक्तिराम गोरे, संजय सोनकांबळे, प्रमोद लोखंडे, उंबर गिरी, नारायण गुंजे, अभिलाषा ठाकूर, मोनिका अतकरे व मनीषा कदम यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. लाड म्हणाले, येणा-या काळात परिसरात असलेल्या उर्वरित रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल. शहरात कोणताही नागरिक नाली व रस्ता यापासून वंचित राहणार नाही यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
या परिसरात अजून काही जे रस्ते उर्वरित आहे ते रस्ते देखील येणा-या काळामध्ये लवकरच पूर्ण केले जातील. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्याबाबत निश्चित राहावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रस्ता प्रश्न मार्गी ज्या ठिकाणी रस्ता उद्घाटन झाले त्याच्या लगत आई इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे. या शाळेमध्ये शहरातील साधारणत: २०० ते २५० चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना येण्यासाठी रस्त्यामुळे कसरत करावी लागत होती. हा रस्ता झाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रस्त्याचा प्रश्न देखील मार्गी लागल्याने या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उद्घाटनाच्या स्थळी उपस्थित राहून आपला आनंद व्यक्त केला.