मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे महायुतीतील पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेमध्ये बसलेला फटका आता विधानसभेत बसणार नाही आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचे टार्गेट सध्या सर्वांसमोर असताना महायुतीच्या शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दिंडोशी विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात तुफान हाणामारी झाली. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये शिवीगाळ आणि मारामारी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हीडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
लेटर डिस्पॅच करण्यावरून दिंडोशी विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. या लेटरमध्ये असे नेमके काय होते ते मात्र अजून समजू शकले नाही. शाखाप्रमुख संतोष लाड आणि विभागप्रमुख नितीन स्वामी यांच्यात शिवीगाळ आणि तुफान मारहाण झाली आहे.
शाखाप्रमुख संतोष लाड यांच्या कार्यालयात येऊन विभागप्रमुख नितीन स्वामींनी लाड यांच्या कार्यकर्त्याला सुरुवातीला शिवीगाळ केली. राग अनावर होताच संतोष लाड यांनी नितीन स्वामी यांना मारहाण केल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे.