21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेसेनेच्या दसरा मेळाव्याचे स्थान बदलले

शिंदेसेनेच्या दसरा मेळाव्याचे स्थान बदलले

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्याचे स्थान अचानक बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेसेनेचा दसरा मेळावा बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर होणार होता. मात्र आता हा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. त्यानंतर दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडून वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जातात. आता उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा होतो. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर होतो.

मात्र, यंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दसरा मेळाव्याचे स्थान बदलले आहे. आता हा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात सध्या भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुका केव्हाही जाहीर केल्या जाऊ शकतात. यामुळे यावेळच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

शिंदेसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. पहिला दसरा मेळावा हा बीकेसी एमएमआरडी मैदानावर झाला होता आणि दुसरा मेळावा आझाद मैदानावर झाला होता. तर यावर्षी शिंदेंचा तिसरा दसरा मेळावा बीकेसीवर होणार होता. मात्र ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता, शिंदेसेनेने यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावरच घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मेळावा होत असल्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून काय नवे खुलासे, आरोप-प्रत्यारोप होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR