नांदेड : प्रतिनिधी
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या मंडपात ४८ तासांपुर्वीच भाविकांनी मुख्य मंडपात मुक्काम ठोकला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून भाविक आले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान, उत्तरप्रदेश येथून भाविक येतील, असे सांगण्यात आले. २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी मैदान कौठा येथे दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत आंतरराष्ट्रीय कथा वाचक, भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कथेला महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून भाविक येणार आहेत. सभास्थळी ५० बाय १०० फूट विशाल शाही मंडप उभारण्यात येत आहे. ३७५ बाय ८०० फूट तीन वॉटर फ्रूप मंडप उभारण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ५ हजार स्वंयसेवक नियुक्त केले आहेत.
पंडित प्रदीप मिश्रा यांचे देशासह १५६ देशात अनुयायी आहेत. नांदेडसह महाराष्ट्रात मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. यातील बहुतांश अनुयायी कथेला उपस्थित राहतात. त्यामुळे दररोज ५ लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. कथेला शुक्रवारी दुपारी १ वाजता सुरुवात होईल. पण बुधवारपासूनच म्हणजेच ४८ तासापुर्वीच भाविकांनी मुख्य मंडपात सतरंजी, बेडशीट, ताटपत्री टाकून जागा धरुन ठेवली आहे. उद्या गुरुवारी भाविक मोठ्या संख्येने येतील, असे भाविकांनी सांगितले. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला येणा-या भाविकांना कथा ऐकता यावी यासाठी नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार यांनी दिली.