17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रशेजा-यानेच दिली आमदाराच्या मामाची सुपारी

शेजा-यानेच दिली आमदाराच्या मामाची सुपारी

हत्येप्रकरणी पुणे पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. सोमवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले.

परंतु, घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर काही तासांमध्येच त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून मोठी माहिती उघड करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई करत सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी देणा-या व्यक्तीला अटक केल्याची माहिती दिली आहे. तर ही हत्या वैयक्तिक कारणातून केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यांनी या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या वैयक्तिक कारणातून झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळे कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून ही हत्या खासगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पाचपैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली, त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले आहे.

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी दोन जणांना ताब्यात घेतले. पवन शर्मा आणि नवनाथ गुरळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सतीश वाघ यांची नेमकी कोणत्या वैयक्तिक कारणातून हत्या करण्यात आली, हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR