लातूर : प्रतिनिधी
अयोध्येत राम मंदिरच्या ठिकाणी सोमवार दि. २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सध्या सर्वत्र याची वातावरण निर्मिती सुरु आहे. लातूर शहरात देखील पताका, बॅनर्स लावून वातावरण निर्मिती केली जात आहे. बाजारपेठेत विविध साहित्यांची मागणी होत असताना साहित्यांचा तुटवडा आहे. श्रीरामांचे चित्र असलेल्या झेंड्यांना सर्वाधिक मागणी आहे. परंतू, ते उपलब्ध होत नाहीत. आहे त्यांच्या किंमती खुप वाढलेल्या आहेत.
प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापनानिमित्ताने मंदिरांत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच घरोघरीही कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. याची जय्यत तयारी केली जात आहे. प्रभू रामांच्या मुर्तीची मागणी वाढली आहे. यामुळे मुर्तीच्या किंमतीही वाढल्या आहेत. असे असले तरी लातूर शहरात श्री रामाच्या संगमरवराच्या मुर्त्यांचा तुटवडा झाला आहे. श्री रामांचे चित्र असलेल्या झेंड्यांची मागणी खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण झेंड्यांचा देखील तुटवडा आहे. वाढीव किंमत देवूनही मुर्ती व झेंंडे मिळत नसल्याने रामभक्तांना मुंबई, पुणे, हैदराबाद येथून मुर्त्यां मागविण्याची वेळ आली आहे.
लातूर शहरात श्रीरामांचे चित्र असलेले झेंडे ४० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. भगवी टोपी १५ रुपये, श्रीरामांचे चित्र असलेले बिल्ले १० ते ३० रुपये, भगवे गमजे २० रुपये, दुचाकीला लावण्याचे छोटे झेंडे २० रुपये, आकाश कंदील ४०० ते ७०० रुपयांना उपलब्ध आहेत. या साहित्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आाणलेले सर्व साहित्य एक-दोन दिवसांतच संपले. आता बाहेर गावाहून साहित्य आणावे म्हटले तरी हे साहित्य मिळणे अवघड झाले आहे. कारण संपूर्ण देशातच या साहित्यांची मागणी वाढली आहे, असे येथील व्यापारी सिद्धार्थ धावारे यांनी सांगीतले. प्रभू श्रीरामांची छबी असलेली फोटो फ्रेम ५० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. श्रीराम भक्तांकडून श्रीरामाच्या फोटोला चांगली मागणी असल्याचे फोटो फ्रेमचे व्यापारी अजीम शेख यांनी सांगीतले.
मुंबई, मेरठहून श्रीरामांच्या मुर्ती येथे विक्रीसाठी आणल्या आहेत. श्रीरामांची दीड, दोन फुटाची मुर्तीची किंमत अडीच हजार ते साडे तीन हजार रुपयांपर्यंत आहे. तर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनूमान असा दरबार असलेल्या मुर्तींची किंमत १० ते १५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. किंमत वाढूनही रामभक्त मुर्तीची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे मुर्तीची मागणी वाढली आहे.