अकोला : प्रतिनिधी संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. ते अकोल्यात बोलत होते.
दरम्यान, आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले. त्यावर पलटवार करताना आमदार मिटकरी यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आज अकोल्यात बाहुबली हिंदू संमेलनासाठी येत असलेल्या नितेश राणेंनाही आमदार मिटकरी यांनी टोला लगावला आहे. आपल्या वक्तव्यातून अकोल्यातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, याची काळजी नितेश राणे यांनी घेण्याचा सल्ला आमदार मिटकरींनी राणेंना दिला.
सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का?, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. सुप्रिया सुळे यांच्या संघर्षाच्या काळात अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा होतो. त्यामुळे अजित पवारांसंदर्भात त्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्रात लक्ष असल्याचं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ का उठतोय?, असा सवालही यावेळी आमदार मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार हे स्पष्ट बोलणारे नेते. त्यामुळेच त्यांनी स्पष्टपणे बारामतीसंदर्भातील भूमिका मांडली. सुनेत्रा वहिनींना उभे करण्याचा निर्णय हा पक्षाचा निर्णय होता. तो चूक की बरोबर यावर मी बोलणार नाही. संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडली. संजय राऊतांनीच दोन्ही कुटुंबात भांडणं लावली. पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशूळ का उठतोय? असा सवाल मिटकरी यांनी केला.