बीड : प्रतिनिधी
९ डिसेंबर २०२४ ला संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यात एसआयटी देखील नियुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास करून आरोपपत्र दाखल करण्यात आले. आता सदर प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. हे प्रकरण बीडच्या न्यायालयात चालवण्याची विनंती एसआयटीने केली होती. परंतु, या प्रकरणाची पहिली सुनावणी केज न्यायालयात झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्चला होणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केज न्यायालयात झाली. या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते. तर व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आरोपी उपस्थित होते. सुनावणी दरम्यान बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली. तसेच आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील राहुल मुंडे यांनी केला.
यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी आपली बाजू मांडली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनीदेखील युक्तिवाद केला. २६ मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल असा युक्तिवाद कोल्हेंनी केला. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी २६ मार्चला होणार आहे.